वृद्ध महिलेवर अत्याचार करून लुटणाऱ्यास सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील जत तालुक्यातील जत-निगडी रस्त्यावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिचे दागिने लुटल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. मुनीर खुतबुद्दीन नदाफ (वय 45, मूळ रा. छत्रीबाग रस्ता, जत, सध्या रा. कुपवाड नाका, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान त्याच्याकडून याप्रकारचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नदाफ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि. 26 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास जत ते निगडी रस्त्यावर चालत जाणाऱ्या एका वृद्ध महिलेला एकाने त्याच्या मारुती कारमध्ये लिफ्ट देतो असे सांगितले. उन्हाचा तडाखा असल्याने महिला त्याच्या कारमध्ये बसली. त्यांनंतर त्याने कार आडबाजूला नेवून महिलेवर अत्याचार केला. नंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने काढून घेतले. नंतर तो पसार झाला.

घटनेदिवशी रात्री महिलेने जत पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली.
पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तातडीने या घटनेचा तपास करून संशयिताला अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक पिंगळे यांनी विविध पथके तयार केली. कारचा क्रमांक माहीत नसल्याने पथकांनी जत तालुका पिंजून काढला. पण संशयित सापडत नव्हता. रविवारी निरीक्षक पिंगळे यांना नदाफ यानेच तो गुन्हा केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, परमेश्वर नरळे, अमित परीट, साईनाथ ठाकूर, अशोक डगळे, शशिकांत शिंदे, बिरोबा नरळे, सागर लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
संशयित नदाफ याच्यावर मिरज शहर, कराड, कराड शहर, फरासखाना पोलिस ठाण्यात 8 गम्भीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान जत परिसरात त्याने महिलांचे विनयभंग करून लुटल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पोलिसांचे पथक तपास करत आहे.

Visit : Policenama.com