Sangli News : राष्ट्रवादीच्या धसक्याने भाजप नेत्यांच्या बैठका अन् ‘फोनाफोनी’, BJP कडून ‘तो’ कार्यक्रम रद्द

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली -मिरज -कुपवाड महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपला मोठा धक्का दिल्याने भाजप नेत्यांनी प्रचंड धसका घेतल्याचे दिसून येत आहे. कारण सांगलीत शुक्रवारी (दि. 26) होणारा भाजपच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रमच पक्षाने रद्द केला आहे. महापालिका निवडणुकीत सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून बैठका घेतल्या जात आहेत, एकमेकांना फोनाफोनी केली जात आहे. त्यामुळे आता सांगलीत पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का देत आपला झेंडा फडकावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. त्यानंतर आता पुढे सांगलीत काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान सांगली महापालिका निवडणुकीत महापौरपदी राष्ट्रवादीच्या दिग्विजय सुर्यवंशी यांची निवड झाली. त्यानंतर जयंतरावांच्या अचूक नियोजनाकडे लक्ष वेधत टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपला डिवचले होते.