‘देशभक्ती तुमच्याकडून शिकण्याची आवश्यकता नाही’ : सानिया मिर्झा

हैदराबाद : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ला झाल्यानंतर आजही पूर्ण देश शोकाकुल झाला आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात देशभरातून तीव्र भावना उमटत असताना दिसत आहे. अशातच आता पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहताना टेनिसपटू सानिया मिर्झाने ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटनंतर मात्र नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर मात्र तिने  नेटिझन्सला खडसावले आहे.

आपल्याला ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सला खडसावताना सानियाने एक मोठी पोस्ट शेअर केल्याचे दिसत आहे. ती म्हणाली की, “सेलेब्रिटींना त्यांची देशभक्ती सिद्ध करण्यासाठी कोणत्याही हल्ल्यानंतर ट्विट किंवा इंस्टाग्रामवर पोस्ट करणे गरजेचे आहे, असे अनेकांना वाटते. त्यावरून सेलेब्रिटींना देशाप्रती प्रेम वाटते की नाही, हे सिद्ध होते, असा त्यांचा समज आहे. पण, सेलेब्रिटींवर टीका करणाऱ्या व्यक्ती या स्वतः नैराश्याने ग्रासलेले असतात आणि राग व्यक्त करण्यासाठी त्यांना कोण भेटत नाही. त्यामुळे ते सेलेब्रिटींना टारगेट करून द्वेष पसरवतात.” असं सानियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सानियाने पुढे लिहिले की,” मी भारतासाठी खेळते, याच देशाला पदक मिळवून देण्यासाठी मेहनत घेते आणि त्यातून मी देशाची सेवा करते. मी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहे. हे जवान आपली रक्षा करतात आणि तेच आपले खरे नायक आहेत. 14 फेब्रुवारीचा दिवस हा काळा दिवस होता आणि आशा करते की असा दिवस पुन्हा पाहायला मिळणार नाही. मी शांततेसाठी प्रार्थना करते.”

हैद्राबादमध्ये जन्म घेतलेल्या सानियाने 2010 मध्ये पाकिस्तान क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला.त्यानंतर तिला भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादात सतत नेटकऱ्यांच्या टीकला सामोरे जावे लागते. सानियाचे लग्न तिचा लहानपणीचा मित्र सोहराबबरोबर ठरले होते. २००९ साली सानिया आणि सोहराब यांचा साखरपूडा झाला होता. पण हा साखरपुडा मोडण्यात आला. यानंतर ऑस्ट्रेलियातील स्पर्धांच्यावेळी सानिया आणि शोएब एकत्र आले. पुढे त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. जेव्हा सानिया आणि शोएब भेटले तेव्हा ते दोघेही समदु:खी होते. परंतु दोघांनी एकमेकांशी लग्न केल्यानंतर दोघांचेही आयुष्य बदलून गेले.