नवनियुक्त पालकमंत्री पाटील यांना खा. काकडेंनी केली पहिल्या दिवशी ‘ही’ विनंती !

खासदार काकडेंनी नवनियुक्त पालकमंत्र्यांना भेटून दिल्या शुभेच्छा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज मुंबईत त्यांची भेट घेतली. नवनियुक्त पालकमंत्र्यांना शुभेच्छा देतानाच पुणे शहर व परिसराशी संबंधीत असलेल्या चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना, नदीसुधार योजना, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि पीएमआरडीए संबंधीत विकास प्रकल्पांना अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे खासदार काकडे यांनी विनंती केली.

पुणे शहराच्या संदर्भात चोवीस तास पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा राहिला आहे. मेट्रोचे काम सुरु असले तरी ते अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्याची आवश्यकता आहे. मुळा व मुठा नदीसुधार कार्यक्रम राबविण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि पीएमआरडीए संदर्भातील विकास प्रकल्पांना अधिक वेगवान करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य द्यावे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी संबंधीत अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलवावी अशी विनंतीही खासदार काकडे यांनी पालकमंत्री पाटील यांना या भेटीदरम्यान केली आहे. त्यावर पदभार स्वीकारताच आपण या कामांसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपप्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी काम पाहिले. बापट हे खासदार झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपद व आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. त्यानंतर खासदार संजय काकडे यांनी नवनियुक्त पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतानाच पुण्याच्या विकासप्रकल्पांना गतिमान करून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात विनंती केली.