Sanjay Kakade On Girish Bapat | पुणे शहर आणि भाजपाचा आधारस्तंभ हरपला – संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Kakade On Girish Bapat | पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. आणि त्यांच्यासोबतच्या आठवणींनी मनामध्ये गर्दी केली. अगदी आता धुळवडीच्या दिवशी मी बापट साहेबांना भेटलो. त्यांना रंगाचा टिळा लावला… आणि त्यांनीही मला रंग लावून आशिर्वाद दिला. यावेळी अनेक आठवणींना उजाळा मिळाला. (Sanjay Kakade On Girish Bapat)
भाऊ म्हणून गिरीश बापट सर्वांना परिचित होते. तसेच बापट साहेब म्हणून देखील त्यांची ओळख होती. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कुणीही, कुठेही त्यांना भेटू शकत. त्यांच्याशी बोलू शकत… कट्ट्यावर कार्यकर्त्यांसोबत बसून गप्पांचा फड रंगवावा तो बापट साहेबांनीच. इतका सहज वावर त्यांचा होता. (Sanjay Kakade On Girish Bapat)
राजकारणात नगरसेवक, आमदार, मंत्री, आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश भाऊंचा आलेख कायम चढता राहिला. २०१९ मध्ये ते पुणे शहराचे खासदार देखील झाले. मी देखील यावेळी इच्छुक होतो. परंतु, माझ्याऐवजी त्यांना तिकिट मिळालं. तेव्हा कोणतीही नाराजी अथवा रुसवा-फुगवा न ठेवता मी या निवडणुकीत त्यांचा अतिशय जोमाने प्रचार केला.
कसबा पेठ विधानसभा मतदार संघाचे (Pune Kasba Peth Vidhansabha) ते पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र ठेवून राजकारण व समाजकारण कसं करावं याचा वस्तुपाठ बापट साहेबांनी घालून दिला होता. त्यामुळं समाजात त्यांचं स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण झालं. महाराष्ट्राची संस्कृती आणि विचारधारेला अनुसरूनच त्यांनी काम केलं.
बापट साहेबांचं वक्तृत्व ओघवतं होतं. खास पुणेरी शैलीत ते चिमटे काढत खुमासदार शैलीत भाषण करायचे. समाजाच्या, शहराच्या नेमक्या प्रश्नांची त्यांना जाण होती. पुण्याच्या राजकारणाचं व समाजकारणाचं बापट साहेब हे चालतं-बोलतं विद्यापीठ होतं. त्यांचं योगदान विसरता येणार नाही. पुणे शहरासह महाराष्ट्राच्या राजकारणात गेली पाच दशकं गिरीश बापट हे नाव कायम चर्चेत राहिलं.
बापट साहेबांच्या निधनानं पुणे शहरासह भारतीय जनता पार्टीचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे.
निवडणूक असो की पक्षाचा कोणताही उपक्रम… बापट साहेब हे आधारस्तंभ होते. पुण्याची बारकाईनं माहिती असलेले,
पुणेकरांचं मन जाणणारे असे बापट साहेब होते.
त्यामुळं त्यांच्या निधनानं पुणे शहरासह भाजपाचा आधारस्तंभच हरपला आहे.
आता त्यांच्या कार्यातून, आठवणीतून बापट साहेब आपल्यासोबत कायम सोबत असतील, असं मला वाटतं.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, चिरशांती देवो.
माझ्या व माझ्या परिवाराच्या वतीनं गिरीश भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली!
Web Title :- Sanjay Kakade On Girish Bapat | Pune city and BJP’s pillar lost – Sanjay Kakade
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्या युवतीची आत्महत्या