नोटाबंदीच्या समर्थनार्थ मोर्चा काढणाऱ्या संजय काकडेंचे आता काय मत आहे वाचा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सहयोगी सदस्य आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी नोटाबंदी ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात पहिला मोर्चा काढला होता. पण आता अडीच वर्षानंतर त्यांना हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय चुकला असल्याचे वाटत आहे. आर्थिकदृष्ट्या विचार करता हा निर्णय चुकला असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. एका खाजगी वृत्त वाहिनीवरील चर्चेत त्यांनी हे आपले बदललेले मत सांगितले.

याबाबत त्यांनी सांगितले की, आपण खासदार होण्यापूर्वीच भाजपला समर्थन दिले होते. त्यावेळी आघाडीचे सरकार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केल्यावर जे वादे केले होते. त्यानुसार ७ लाख कोटी रुपये मिळणार होते. त्याचा देशाला फायदा झाला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन आपण त्यावेळी पुण्यात नोटा बंदीच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पण आता आर्थिकदृष्ट्या हा निर्णय चुकला असे वाटते.

संजय काकडे यांना पुण्यातून लोकसभा निवडणुक लढवायची आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपला विश्वास आहे. ते आपल्याला नक्की तिकीट देतील, असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

एकतर्फी निष्ठा चुकीची

पक्षनिष्ठेविषयी ते म्हणाले, पक्षाचे काम करतो म्हणून ते जवळ करतात. सध्याच्या काळात एकतर्फी निष्ठा बाळगणे चुकीचे आहे. आज आपल्याबरोबर असलेल्या नगरसेवकांना हा त्याचा, हा आमचा असे समजून वेगळी वागणूक देतात. शेवटी तेही पक्षाचेच काम करीत आहेत ना. भाजपच्या काही लोकांना मी नको आहे, असेही त्यांनी सांगितले.