…तर सगळे मतभेद विसरुन PM मोदींसोबत उभे राहू, संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होत असेल तर आम्ही सगळे मतभेद विसरुन देशाच्या पंतप्रधान मोदींसोबत उभे राहू, आपल्या देशातील नेता असो किंवा सरकार असो त्यांचा राष्ट्रीय पातळीवर अपमान होत असेल तर ते योग्य नाही, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे. ते आज मुंबईत प्रसारमध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मद्रास कोर्टाच्या टिप्पणीवर देखील भाष्य केले.

राष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र

संजय राऊत म्हणाले, राष्ट्रीय पातळीवर भारताचा अपमान होत असेल तर आम्ही सगळे मतभेत विसरुन देशाच्या पंतप्रधानांच्या पाठीमागे उभे राहू. मोदी जे धोरण बनवतील त्यामागे उभे राहिले पाहिजे. आपला देशातील नेता असो किंवा सरकार याचा राष्ट्रीय पातळीवर अपमान होणे हे योग्य नाही. देशातील कोरोना परिस्थीतीचे परदेशात जे चित्र निर्माण केले जात आहे त्यातून सामाजिक स्वास्थ्य आणि देशातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे हे षडयंत्र असू शकतं. त्याविरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

मद्रास कोर्टाची टिप्पणी गांभीर्याने घेतली पाहिजे

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मद्रास हायकोर्टाच्या टिप्पणीवर भाष्य केले. ते म्हणाले, आपल्या देशातील मोठे मंत्री म्हणतात निवडणूक आणि कोरोना याचा काहीही संबंध नाही. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या ठिकाणी कोरोना वाढला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पण पश्चिम बंगाल, केरळ, या मोठ्या राज्यात निवडणुका झाल्या. भाजपनं देशभरातून प्रचारासाठी त्या राज्यात लोक गोळा केले. तेच लोकं आपापल्या राज्यात गेल्यामुळे कोरोना वाढतोय. कुंभमेळ्यावर आक्षेप घेताना अशा प्रकारचा राजकीय कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढतोय. सध्या देशातील परिस्थिती गंभीर असताना या गोळी आपण पाळल्या पाहिजेत. मद्रास हायकोर्टाने केलेली टिप्पणी गंभीरतेनं घेतली पाहिजे, असे राऊत म्हणाले.

मोदींवर माझा पूर्ण विश्वास

माझा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे. मोदींनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी त्यांनी धोरण आखलं आहे ते पाहता मद्रास कोर्टाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील असा मला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

माजी आयुक्तांना राज्यपाल केलं जातंय

मद्रास हायकोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये असे म्हटले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला त्याच निवडणूक आयुक्तांना राज्यपाल केलं जात आहे असे कळत आहे. एकीकडे कोर्ट मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे म्हणत आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार निवडणूक आयुक्तांना रिटर्न गिफ्ट देत असल्याच टोलाही संजय राऊत यांनी लगावला.