देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे पश्चिम बंगालमध्ये, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामध्ये अद्यापही वाद असल्याचे नेत्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या नियुक्तीवरून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. देशातील दोनच राज्यात राज्यपाल नियुक्त आहेत, असा टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्येच राज्यपाल आहेत, असे म्हणत मोदी सरकारला चिमटा काढला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पात्र लिहले. यानंतर, उद्धव ठाकरे यांनी देखील जशासतसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष पुन्हा एकदा पेटल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल सरकारच्या कामात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप केला. तसेच घटनात्मक पद असून राज्यघटनेला अनुसरून राज्य चालते की नाही, हे पाहणे राज्यपालांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला राज्यपालांच्या भूमिकेवरुन लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले, देशात केवळ दोनच राज्यात राज्यपाल आहेत, एक महाराष्ट्रात आणि दुसरे पश्चिम बंगालमध्ये. राज्यपाल हे भारत सरकार आणि राष्ट्रपतींचे पॉलिटकल एजंट असतात, कारण ते राजकीय काम करतात. सध्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये विरोधी सरकार आहे, म्हणून देशातील या दोनच राज्यात राज्यपाल असल्याचा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असून या ठिकाणी जगदीप धनखार हे राज्यपाल आहेत. मात्र, येथेही राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये सतत खटके उडताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल असून त्यांच्यात आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याचे पहायला मिळत आहे.