कोणतेही काम करत असताना मुखाने ‘रामराम’ म्हणा, होईल ‘हा’ फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

कामामध्ये काम | काही म्हणा रामराम | जाइल भवश्रम | सुख होईल दु:खाचे ||१|| कळो येईल अंतकाळी | प्राणप्रयाणाचे वेळी | राहती निराळी | रांडापोरे सकळ ||२|| जीता जीसी जैसा तैसा | पुढे आहेरे वोळसा | उगवुनि फांसा | काय करणे ते करी ||३|| केले होतेयाचि जन्में | अवघे विठोबाच्या नामे | तुका म्हणे वर्मे | जाणोनिया तरती ||४|| (संत तुकाराम महाराज अभंग गाथा, अभंग क्र. ३११५)

जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, कोणतेही काम करत असताना मुखाने रामराम असा नामजप करा. राम नाम जप केल्याने संसारश्रमाचा नाश होईल, आणि दु:खरूप संसार सुखरूप होईल. नाहीतरी अंत:काळी तुम्हाला हे कळून येईल की, बायको व मुले तुमच्यापासून दूर राहिली आहे. तुकोबाराय पुढे म्हणतात की, असे, तुम्ही आयुष्य आहे तो पर्यंत कसेतरी जगताल, पण पुढे जन्ममृत्यूचा मोठा फेरा आहे. त्यात सापडायचे नसेल तर जे करायचे ते आत्ताच करा. या मानवजन्मामध्येच विठोबाच्या चिंतनाने काही केले तर होईल. हे मर्म जाणून जे सावध होऊन भगवंताची भक्ती करतील ते तरतील. असे तुकोबाराय म्हणतात.