देहाचा कधी ‘नाश’ होईल सांगता येत नाही, म्हणून ‘या’ गोष्टींसाठी ‘घाई’ करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –

पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ।।
बांधू विठ्ठल सांगडी । पोहूनि जाऊ पैल थडी ।।
अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ।।
हे तो नाही सर्वकाळ । अमूप आनंदाचे जळ ।।
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथे येणे ।।

संत तुकाराम महाराज म्हणतात की, हरीच्या नामसंकीर्तनाने, त्याच्या सततच्या नामघोषाने आमच्या जीवनात आनंदाचा पूर आला आहे, त्यातून प्रेमाच्या लाटा उसळत आहेत आणि त्यामुळे असे वाटत आहे की ह्या आनंदाच्या भरी ह्या भवसिंधुतून पार करून जाण्यास विठ्ठलालाच, म्हणजे त्याच्या नामालाच आपल्या कमरेला सांगड म्हणून बांधून आताच याचक्षणी पैलतीर गाठू.

ते इतर लोकांना उद्देशून म्हणतात की बांधवानो, मित्रांनो तुम्ही देखील आता तातडी करा आणि विठ्ठल सांगडी बांधून हा भवसागर पार करण्यासाठी त्यात उडी घ्या कारण हा अमूप आनंदाचा क्षण आपल्याला सर्वकाळ लाभणार नाही किंबहुना सर्वकाळ टिकून देखील राहणार नाही कारण हे सुख ज्या साधनामुळे आपल्याला मिळते तो हा नरदेह नाशिवंत असून तो सर्वकाळ आपल्याकडे राहणार नाही म्हणून हे पुण्य जो पर्यंत आपले गाठीशी आहे तोपर्यंत तुम्ही हे कार्य साधून घ्या.

तुकोबाराय शेवटी म्हणतात की, किंबहुना हा नरदेहाचा लाभच आपल्या पूर्वजांच्या पूर्वपुण्याईमुळे आपल्याला लाभला आहे आणि असा हा परमार्थाला जायचा मार्गच त्यांच्याच संचितामुळे आपल्या वाट्याला आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/