पोलिस आयुक्तांच्या बंगल्यावरील कर्मचार्‍यास सरपंचानं पिस्तूल दाखवलं, गुन्हा दाखल होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सीपींच्या बंगल्यावर ड्युटीस असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास पिस्तूल दाखवणारा जिल्ह्यातील बहुचर्चीत गावचा सरपंच असल्याचे समोर आले आहे. त्या दोघांत टपरीवर उभारल्यानंतर वाद झाला आणि या वादातून त्यांच्या झटापट झाली. त्यातून पिस्तूल दाखविल्याचे कर्मचारी सांगत आहे. मात्र, तो कर्मचारी मद्यपानात असल्याने त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवायला तयार नव्हते. परंतु, दिवसभराच्या चौकशी आणि तपासात घटना घडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या सरपंचाकडे पिस्तूलाचा कायदेशीर परवाना आहे.

याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. चौकशी सुरू असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कर्मचारी पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर ड्युटीस आहे. त्याची रविवारी साप्ताहिक सुट्टी असते. रविवारी मद्यपान केल्यानंतर तो ज्ञानेश्वर महाराज पादुका चौकातील एका टपरीवर पान खाण्यासाठी गेला. त्यावेळी संरपचही त्याठिकाणी टपरीवर आला होता. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वाद झाल्यानंतर झटापटही झाली. त्यावेळी संरपचाकडील पिस्तूल खाली पडले. त्याने ते उचलून घेतले. त्याचदरम्यान कर्मचार्‍याने लाईन बॉय आणि नियंत्रण कक्षाला पिस्तूल दाखविल्याचे सांगितले. त्यामुळे काही लाईन बॉय येथे आले. त्यावेळी येथे वाद झाले. संरपचाला मारहाणही करण्यात आली. त्यावेळी झालेल्या मारहाणीत पिस्तूलाचे कव्हर खाली पडले. संपरच वाद वाढल्यानंतर आपल्या स्कॉर्पिओतून निघून गेला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती शिवाजीनगर पोलीसांना दिली. पोलीस याठिकाणी आल्यानंतर कर्मचार्‍याने मद्यपान केले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रथम वरिष्ठांच्या ही बाब कानावर घातली. त्यांनी त्याचे मेडिकल करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी मेडिकल केले. कर्मचारी पोलीसांना झालेला प्रकार सांगत होता, परंतु, तो मद्याच्या नशेत असल्याने त्याच्यावर प्रथम कोणी विश्वासच ठेवला नाही. मात्र, दिवसभर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीसांनी केलेल्या तपासात टपरीवर उभारल्यानंतर झालेल्या वादातून वाद, मारहाण आणि गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com

You might also like