मराठा आरक्षण : उदयनराजे भोसले यांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले – ‘जनाची नाही तरी मनाची तरी थोडी राखा’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाची मागणी रास्त आहे. आरक्षण मिळणार नसेल तर मग नैराश्य येणार नाही का ? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे. आरक्षणासाठी आजपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या तरी देखील राज्य सरकार श्‍वेतपत्रिका आणत नाही. त्यामुळे लोकांना कळू द्या तुम्ही नेमके काय दिवे लावले, अशी आक्रमक टीका उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अनेकांना आजपर्यंत भेटलो, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे सांगत जनाची नाही तर मनाची तरी थोडी राखा, असा सल्लाही उद्यनराजे यांनी दिला आहे.

साताऱ्यातील जलमंदिर निवास्थानी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. आरक्षणासाठी आता लोकांचा उद्रेक होईल आता तुम्ही ठरवा काय करायचे आहे ते. आता मी विष पिणार नाही पाजणार आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. दरम्यान काल पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांना उदयनराजेंच्या विष प्यायच्या परवानगीबाबत विचारल्यावर अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत आवाज उठवावा असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना उदयनराजे यांनी अजितदादा तुम्ही नेमकं काय केल हे दाखवून द्या तुम्ही स्वतःला तज्ञ समजता, तर श्‍वेतपत्रिका आणा असाही टोलाही उदयनराजेंनी लगावला आहे. .