Satara News : ‘पाल’ची खंडेरायाची यात्रा रद्द, यंदा घुमणार नाही येळकोट येळकोटचा जयघोष

उंब्रज (जि. सातारा) : पोलीसनामा ऑनलाइन – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता. कऱ्हाड) येथील सोमवारी (दि 25) होणारी श्री खंडोबा देवाची यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली आहे. मात्र, यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा, रूढी, परंपरेनुसार केले जाणार आहेत. सासनकाठ्या, पालख्या, बैलगाड्यांना या कालावधीत पाल व परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

श्री खंडोबा देवाची यात्रा 23 ते 29 जानेवारी कालावधीत तिथीप्रमाणे आयोजित केली होती. यात्रेचा मुख्य दिवस 25 जानेवारी रोजी होता. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यातून पाच ते सहा लाख भाविक देवदर्शनासाठी येतात. यामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही, त्यामुळे यंदा यात्रा रद्द केली आहे. यात्रा कालावधीत फक्त श्री खंडोबा देवाची पूजाअर्चा, धार्मिक विधी केले जाणार असून, धार्मिक विधी झाल्यानंतर श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. 23 जानेवारी ते 29 जानेवारी यात्रा कालावधीमध्ये दुकाने, स्टॉलना परिसरात मनाई केली आहे.

यात्रा कालावधीनंतर 31 जानेवारी रोजी पाकळणीच्या दिवशीसुद्धा धार्मिक विधीनंतर श्री खंडोबा मंदिर बंद ठेवण्याबाबत आदेश प्रशासनाने दिले आहेत. यात्रा कालावधीत ट्रस्टी, पुजारी, पाल गावातील मानकरी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंदी घातली आहे. धार्मिक विधी ठिकाण सोडून मंदिर परिसरात पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. कऱ्हाडच्या प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार यात्रा रद्द केली आहे.