SBI मध्ये अडचण आल्यास करा थेट ‘या’ तारखेला अधिकाऱ्याकडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेली ‘स्टेट बैंक ऑफ इंडिया’ ग्राहकांच्या हितासाठी २८ मेला ग्राहक संमेलन आयोजित करणार आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात हे ग्राहक संमेलन आयोजित केले जाणार आहे. या संमेलनात बँकेचे मोठे अधिकारी ग्राहकांच्या बँकेसंबंधी असणाऱ्या समस्या सोडवणार आहेत. बँकेच्या कोणत्याही सेवेबद्दल तक्रार असेल तर त्याची थेट तक्रार अधिकाऱ्यांना करता येणार आहे. बँकेचे वरिष्ठ अधिकारी या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनाच्या दरम्यान ग्राहक बँकेच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधू शकणार आहेत. ग्राहक बँक देत असलेल्या सेवेबद्दल मतदेखील व्यक्त करू शकतील.

बँकेने सांगितले की ग्राहकांच्या समस्या समजून घेणे आणि बँकेच्या सेवा अजून चांगल्या बनवणे, हा या संमेलनाचा उद्देश आहे. स्टेट बँक बँकेच्या १७ स्थानिक कार्यालयाच्या माध्यमातून ५०० पेक्षा जास्त ठिकाणी संमेलनाचे आयोजन करणार आहे. एक लाखापेक्षा जास्त ग्राहकांशी संपर्क साधणार हे बँकेचे लक्ष्य आहे. ग्राहकांच्या मनात बँकेच्या सेवांविषयी विश्वास निर्माण करणे हा या संमेलनाचा हेतू असल्याचे डिजिटल बिजनेस चे एमडी पी के गुप्ता यांनी सांगितले. बँकेच्या सेवेमुळे नाराज असणाऱ्या ग्राहकांची नाराजी दूर करणे हा या संमेलनाचा हेतू आहे.