चिंताजनक ! SBI च्या लाखो ग्राहकांचा बँक बॅलेन्स आणि महत्त्वाची माहिती लीक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ( SBI) ग्राहकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील सर्व्हरमधून हजारो ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील सर्व्हर कोणत्याही सुरक्षेशिवाय ठेवण्यात आला होता, त्यामुळे बँक बॅलन्स, खाते क्रमांक याच्यासह इतर महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, एसबीआय बँक सर्व्हरचा पासवर्ड टाकण्यास विसरलं होतं. यामुळे ज्यांना सर्व्हरमधून ग्राहकांची माहिती कशी मिळवली जाते याची कल्पना आहे त्यांनी याचा गैरवापर केल्याची शक्यता आहे. सर्व्हर किती वेळासाठी सुरक्षेविना होता याची माहिती मिळू शकली नाही. एसबीआयने याप्रकरणी कोणतीही माहिती दिलेली नाही.
रिपोर्टनुसार, सुरक्षा नसलेला हा सर्व्हर हा बँकेच्या SBI Quick सेवेचा भाग होता. यावरुन ग्राहक सामान्य माहिती मिळवण्यासाठी मेसेज किंवा मिस कॉल देऊन ती माहिती मिळवू शकतात. बँकेने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, SBI Quick – MISSED CALL BANKING ही मोफत सेवा असून तुम्ही तुमचा बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट आणि इतर माहिती आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एसएमएस किंवा मिस कॉल देऊन मिळवू शकता.

SBI Quick सेवा थेट ग्राहकांच्या मोबाइल फोनशी संलग्न असल्याने सर्व्हरमधून लीक झालेला डाटा वापरत खात्यातील पैशांची अफरातफर होण्याची भीती आहे.