Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळं पुण्यात कलम 144 लागू होण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते. पुण्यातील जमावबंदीबद्दल अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र आवश्यकता भासल्यास हा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. म्हैसकर म्हणाले, नव्याने ज्या पाच नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे ते लोक कोणत्याही बाहेरील देशात प्रवास करून आलेले नाहीत. त्यांना बाहेरील देशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोनाचा प्रसार हा विदेशात न गेलेल्या नागरिकांना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यातील काही ठिकाणी कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यात 57 जण अ‍ॅडमिट आहेत. NiV 315 सॅम्पल पाठवले होते. त्यातील 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 15 जण वगळता बाकी निगेटिव्ह आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्यात 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. काल आम्ही मॉल बंद केले आहेत. फक्त त्यातील मेडिकल्स व जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरु राहतील. त्यामुळे लोकांनी घरं सोडू नयेत, ही विनंती, शासन आदेशाचे पालन करावं, असे आवाहन दीपक म्हैसकर यांनी केलं आहे.