रक्तचंदनाची तस्करी करणारी टोळी गजाआड, साडेसात कोटींचे रक्तचंदन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विक्रीसाठी बंदी असलेल्या दुर्मिळ रक्तचंदन लाकडाची तस्करी करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीतील त्रिकुटला मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-9 ने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 1 हजार 566 किलो रक्तचंदन जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात 7 कोटी 50 लाख रुपये किंमत आहे. ही कारवाई पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ येथे करण्यात आली.

असगर इस्माईल शेख (वय-49), अली शेख (वय-32), वाजिद अन्सारी (वय-32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेले रक्तचंदन परदेशात पाठविण्यात येणार होते असे तपासात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन टेम्पो मधून रक्तचंदानाची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव गावडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सांताक्रुझ पश्चिम येथील द्रुतगती महामार्गावर सापळा रचून दोन टेम्पो अडविण्यात आले.

टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये रक्तचंदन आढळून आले. हे रक्तचंदन गुजरातमार्गे वाहतूक करून परदेशात पाठविण्यात येणार होते. या तस्करीचा प्रमुख सुत्रधार कोण, ती कोठून आणण्यात आली याबाबत चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले आहे.