अनेक महिलांना जबरदस्तीने मिठी मारून विनयभंग करणार्‍याला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पन्नासहू अधिक महिलांचा विनयभंग करणाऱ्या एका सिरिअल मोलेस्टरला (Serial Molester) दिंडोशी पोलिसांनी (Dindoshi police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. या नराधमाने 2011 पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा विनयभंग केला आहे. आरोपीला आतापर्यंत 12 प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. तो अनेक पोलिस ठाण्यात मोस्ट वॉण्टेड होता. कल्पेश देवधरे असे या आरोपीचे नाव आहे.

12 डिसेंबर रोजी दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने 24 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मिठी मारली होती. त्यानंतर तिच्यासोबत गैरवर्तन करुन तो फरार झाल्याची तक्रार तरुणीने दिंडोशी पोलीस ठाण्यात केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर या आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले. या पथाने घटना घडली त्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी केली. 2017 मध्ये अशाच प्रकारचा एक गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या आरोपीची माहिती घेऊन दिंडोशी पोलीस आरोपी कल्पेश देवधरेच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

50 महिलांचा विनयभंग

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. 2011 मध्ये एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामीनावर सटला होता. या नराधमाने जवळपास 50 महिलांचा विनयभंग केल्याचे चौकशीत समोर आले. त्याने महिलांचा विनयभंग केल्याचे कबूल केले आहे. आरोपीवर डी.एन. नगर, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव, कांदिवली, पार्क साईट, बांगूर नगर चुनाभट्टी इत्यादी पोलीस ठाण्यात अपहरण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.