Serum इन्स्टिट्यूटने जाहीर केले Covishield चे दर, 5 महिन्यानंतर ‘कोविशिल्ड’ रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये उपलब्ध असेल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद होत आहे. मागील काही दिवसांपासून देशात अडीच लाखांच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आणखी कडक निर्बंध लावण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकराने 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपली लस खुल्या बाजारात विक्री करण्यास परवानगी दिली आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना उत्पादीत केलेल्या लसींपैकी 50 टक्के लसींची विक्री खुल्या बाजारात करता येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर निश्चित केले आहेत. आजच्या घडीला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सध्या दर महिन्याला 7 कोटी लसीचे उत्पादन होत आहे.

भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं आपल्या कोविशिल्ड लसीचे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना सीरम ही लस 400 रुपये प्रति डोसच्या हिशोबाने तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रति डोसच्या हिशोबानं देणार आहे. सिरम इन्स्टिट्यूटने ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, एकूण लसीच्या उत्पादनाच्या 50 टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेसाठी दिला जाणार आहे. तसेच उर्वरित हिस्सा हा राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना दिला जाणार आहे. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली. पुढील दोन महिन्यांमध्ये आम्ही लसींचे उत्पादन वाढवणार असून लसींची कमतरता भरून काढणार आहोत, अशी माहिती सीरमकडून देण्यात आली आहे. पुढील पाच महिन्यानंतर कोविशिल्ड ही लस रिटेल आणि फ्री ट्रेडमध्ये कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असेल, असेही कंपनीने म्हटले आहे.