सीरम इन्स्टीट्यूटला मिळाली इंट्रानॅसल ‘कोरोना’ वॅक्सीनच्या ट्रायलसाठी मंजूरी, नाकाद्वारे दिली जाणार ‘ही’ लस

नवी दिल्ली : जगभरात कोरोना संसर्गाने सुमारे 4 कोटी लोक संक्रमित झाले आहेत, तर आतापर्यंत या महामारीने 10 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश देश कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. आता वृत्त आहे की, संसर्गाच्या नियंत्रणासाठी इंट्रानॅसल वॅक्सीनची निर्मिती केली जाऊ शकते. यासाठी भारतात ट्रायल सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

वृत्तानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचे म्हणणे आहे की, या वॅक्सीनच्या ट्रायलची सुरूवात सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक करू शकतात. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या देशात कुठेही नोजल वॅक्सीनवर कोणतीही ट्रायल झालेली नाही. ही वॅक्सीन नाकाद्वारे संक्रमित व्यक्तीच्या शरीरात पोहचवली जाईल.

डॉक्टर हर्षवर्धन यांच्या माहितीनुसार, नोजल कोरोना व्हायरस वॅक्सीन तयार करण्यासाठी भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिन आणि सेंट लुइस युनिव्हर्सिटीसोबत करार केला आहे. या करारांतर्गत देशात सार्स-कोव्ह-2 साठी इंट्रानॅसल वॅक्सीनच्या ट्रायलसोबतच उत्पादन आणि विक्री होऊ शकते.

कोरोनाबाबत डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, संसर्गाची वॅक्सीन येण्यासासाठी 2022 पर्यंत वेळ लागू शकतो. तर सध्या भारतात रशियाची वॅक्सीन स्पुतनिक व्ही साठी लेट स्टेज क्लिनिकल ट्रायलसाठी भारताच्या डॉक्टर रेड्डीज आणि रशियन डायरेक्ट इन्वहेस्टमेंट फंडसाठी सुद्धा मंजूरी मिळाली आहे.