शबाना आझमी अपघात : वैद्यकीय तपासणीच्या अहवालात ‘ही’ माहिती आली समोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर शनिवारी झालेल्या कार अपघातात अभिनेत्री शबाना आझमी या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. त्यांना अपघातानंतर एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना मध्यरात्री अंधेरीतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (केडीएएच) हलवण्यात आले होते.

वैद्यकीय तपासणीचा अहवाल
केडीएएचमध्ये वैद्यकीय तपासणीनंतर एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ यांनी शबाना आझमी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाले असल्याचे सांगितले असून त्या डॉक्टरांच्या देखरेखीत आहेत असे देखील सांगितले. तसेच शबाना आझमी यांच्या एक्स रे, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउण्ड आणि अन्य चाचण्या करण्यात आल्या असून त्यांना डोकं, मान, सर्वाइकल स्पान, चेहरा आणि उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. (लेफ्टनन्ट) के.आर. सालगोत्रा यांनी सांगितले.

ट्रक ड्रायव्हरने शबाना यांच्या चालकाविरोधात नोंदवली तक्रार
मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर शनिवारी संध्याकाळी ४:१५ च्या सुमारास शबाना आझमी यांची गाडी एका ट्रकला जाऊन धडकली. या प्रकरणी ट्रक चालकाने शबाना यांचा चालक अमलेश कामत विरोधात खालापुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार, शबाना आझमी यांचा कारचालक गाडी भरधाव वेगाने चालवत होता आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्याने ट्रकला धडक दिली. त्यामुळे त्याच्या बेजबाबदारपणे गाडी चालविल्याने हा अपघात झाला आहे.

दरम्यान या अपघातानंतर शबाना आझमी गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या, त्यांच्या गाडीच्या मागेच पती जावेद अख्तर यांची गाडी होती. या अपघाताची माहिती मिळताच सर्वांनी शबाना आझमींची विचारपूस केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून शबाना आझमींच्या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली. तसेच अनेक लोकांनी त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/