जेलमधून सुटलेल्या कपिलचं ढोल-ताशांनी ‘स्वागत’, शाहीनबागमध्ये केली होती ‘फायरिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहीन बागमध्ये आंदोलनस्थळी फायरिंग करणार्‍या कपिल गुर्जरची न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. जेलमधून सुटल्यानंतर 7 मार्चच्या रात्री सुमारे पावणे बारा वाजता जेव्हा कपिल आपल्या घरी पोहचला तेव्हा स्थानिक समर्थकांनी ढोल-ताशा वाजवून त्याचे स्वागत केले आणि खांद्यावर घेतले. यावेळी अनेकजण त्याची गळाभेट घेत होते.

कपिलला रात्री सुमारे साडेदहा वाजता रोहिणी जेलमधून सोडण्यात आले. यानंतर तो थेट दल्लुपुरा येथील आपल्या घरी पोहचला. घराच्या बाहेर मुख्य रस्त्यावर लोक कपिलची वाट पाहात होते. लोकांनी कपिलला खांद्यावर घेऊन घरापर्यंत नेले. घराजवळ पोहचताच ढोल-ताशाच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरूद्ध (सीएए) शाहीन बागमध्ये आंदोलन सुरू आहे. कपिल गुर्जरने शाहीन बागमध्ये आंदोलस्थळाच्या जवळ 1 फेब्रुवारीला फायरिंग केली होती. नंतर आम आदमी पार्टीशी कपिलचे कनेक्शन असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले होते. परंतु, कपिलचे वडील आणि भावाने आम आदमी पार्टीशी त्याचा आणि कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.

प्रत्यक्षात दिल्ली पोलिसांनी दावा केला होता की, शाहीन बागमध्ये फायरिंग करणारा कपिल गुर्जर आम आदमी पार्टीशी संबंधीत आहे. कपिलचे वडील गजे सिंहसुद्धा आम आदमी पार्टीशी संबंधित आहेत. पोलिसांनी दावा केला होता की, कपिलने चौकशीत सांगितले आहे की त्याने आणि त्याच्या वडीलांनी 2019 च्या सुरूवातीला आम आदमी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले होते. परंतु, नंतर पोलिसांचा हा दावा खोटा असल्याचे कपिलचे वडील आणि भावाने म्हटले होते.