भाजपवर नामुष्की ! शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्याचा पक्षप्रवेश अन् सदस्यत्वही रद्द

लखनऊ : वृत्तसंस्था – गाझियाबाद येथे बुधवारी बसपमधील काही युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी येथील शाहीनबाग परिसरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) निदर्शने सुरू असताना हवेत गोळाबार करणारा कपिल गुज्जर यानेही भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, काहीवेळातच त्याचे सदस्यत्व भाजपने रद्द केले.

दरम्यान, उत्तर प्रदेश भाजपचे सरचिटणीस जेपीएस राठोड म्हणाले, कपिल गुज्जर याला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मिळताच काही वेळातच त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.

भाजपमध्ये काही युवकांनी प्रवेश केला. त्यावेळी कपिललाही प्रवेश आला. आम्हाला त्याचा शाहीनबाग प्रकरणात सहभाग असल्याची माहिती नव्हती, असे भाजपचे गाझियाबाद महानगरचे अध्यक्ष संजीव शर्मा यांनी सांगितले. शाहीनबाग प्रकरणातील त्याच्या सहभागाबाबतची माहिती मिळताच त्याचे सदस्यत्व तातडीने रद्द केल्याचेही त्यांनी सांगितले.

कपिल गुज्जरने १ फेब्रुवारी रोजी हवेत गोळीबार करण्याची घटना समाजमाध्यमावर मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाली होती. त्यात त्याने प्रक्षोभक भाषा वापरली होती. पोलीस बाजूला असतानाही त्याने हवेत दोन-तीन वेळा गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते.