तरुण उद्योजक शैलेश जोशी यांची गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या

बेळगाव : देशातील प्रसिद्ध  अमृत फार्माचे व्यवस्थापकीय संचालक शैलश जोशी (वय ४०, रा. विजय नगर, बेळगाव) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.  ही घटना रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बेळगाव येथील त्यांच्या राहत्या घरी घडली. त्यांच्या आत्म्हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते संचालकही होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्वरने छातीवर गोळी झाडली. गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या पाहणी दरम्यान शैलेश यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अमृत मलममुळे अमृत फार्माची उत्पादने घरोघरी पोहोचली आहेत.

शैलेश जोशी यांनी भाजपात प्रवेश करून आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरूवातही केली होती़

स्वत: व्यसनमुक्त होऊन इतरांनीही व्यसनापासून दूर राहावे, यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली आहे. १९३८ मध्ये त्यांची आजी माई जोशी यांनी स्थापन केलेली अमृत फार्मास्युटिकल्स त्यांचे वडील शरद जोशी यांनी वाढविली.  कर्नाटक महाराष्ट्रासह दक्षिण भारतात अमृत फार्मास्युटिकल्सचे नाव शैलेश जोशी यांनी नेले. यशस्वी उद्योजक म्हणून  त्यांनी चांगले नाव कमावले होते. जाणता राजकारणी आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा तरुण उद्योजक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे संपूर्ण बेळगावकरांना धक्का बसला आहे.