रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी ‘या’ माजी आर्थिक सल्लागाराची निवड

नवी दिल्ली: वृत्तसंस्था उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. आता त्यांच्या पदावर माजी आर्थिक सल्लागार आणि वित्त आयोगाचे सदस्य शक्तीकांता दास यांची आरबीआय गव्हर्नरपदी नियुक्ती करण्य़ात आली आहे.

याआधी गव्हर्नर पदावर असलेले उर्जित पटेल यांची 2016 साली आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी, मोदींचे समर्थक म्हणून त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. मात्र,सप्टेंबर 2019 पर्यंत कार्यकाळ असतानादेखील अंतर्गत मतभेदाचे कारण सांगत उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याकडे राजकीय दृष्टीकोनातूनही पाहिले जात असून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर, मोदी सरकार असणाऱ्या वादामुळेच अखेर त्यांनी राजीनामा दिला अशा प्रतिक्रिया विरोधकांकडून येत आहेत.

यापूर्वी देखील भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी या पदासाठी मुदतवाढ स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. राजन यांनी घेतलेल्या  निर्णयानंतर देखील देशभरात खळबळ उडाली होती. तर, उद्योगजगतातुन राजन यांच्या निर्णयामुळे देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी प्रतिक्रिया त्यावेळी नोंदवली जात होती.