सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळेच मंदीचे सावट 

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळेच देशात सर्वत्र मंदीचे सावट आहे. अजून किमान वर्षभर तरी मंदीचे हे सावट कायम राहणार आहे, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वर्तविले आहे. काळा पैसा भारतात परत आणण्याच्या आश्वासनासह मोदींचे नोटाबंदीचे धोरणही फसले आहे. आता केंद्र सरकार रिझव्र्ह बँकेसह देशातील बँकिंग क्षेत्र, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांवर हल्ले करत आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

बारामतीतील दि मर्चंट्स असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पवार यांनी दरवर्षीप्रमाणे व्यापाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, बाजारपेठेतील मंदीसाठी व केंद्र सरकारची चुकीची धोरणे जबाबदार आहेत. सत्तापरिवर्तनाशिवाय हे चित्र बदलणे शक्य नाही. लोकसभा निवडणुकीत परदेशातील काळा पैसा भारतात परत आणून सर्वसामान्यांच्या खात्यात जमा करण्याचे मोदींनी दाखविलेले स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरले.

त्यानंतर देशातील काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने त्यांनी घेतलेला नोटा बंदीचा निर्णयही फसला. त्यामुळे आर्थिक बाबतीत मोदी सरकारने घेतलेले निर्णय शहाणपणाचे नव्हते हे आता समोर येत आहे. इतर कोणते निर्णय चुकल्यास थोडाफार परिणाम होतो, मात्र आर्थिक राजकारणातील निर्णय चुकल्यास त्याचे वाईट परिणाम अर्थव्यवस्थेसह व्यापार उद्योगांना भोगावे लागतात, असे पवार म्हणाले.