शरद पवारांनी घेतली खा. राऊतांची भेट, केली प्रकृतीची चौकशी

पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात महाविकास आघाडी उभारण्यात आणि या आघाडीचे सरकार आणण्यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे दोन नेते म्हणजे शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. हे दोघे सत्तास्थापनेआधी एकत्र भेटल्यावर त्यांच्या भेटीची चर्चा होणे स्वाभाविक होते. पण सत्तास्थापना झाल्यानंतरही पवार-राऊत यांची भेट कायमच लक्ष वेधून घेते. अशीच एक भेट पवार- राऊत यांच्यात रविवारी (दि. 6) भांडुप येथील राऊतांच्या मैत्री बंगल्यावर झाली. राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची विचारपूस करण्यासाठी पवारांनी ही भेट घेतली.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शनिवारी (दि. 5) राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर शरद पवार यांनी भांडुप येथील राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतरही दिग्गज नेतेमंडळी उपस्थित होते. राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या काही दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि प्रकृतीची चौकशी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केल्यानंतर शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडे हे तिघे राऊत यांच्या घरी गेल्याची माहिती देण्यात आली.

संजय राऊत यांच्यावर बुधवारी (दि. 2) लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेत त्यांच्या हृदयात दोन स्टेन टाकण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. खरे पाहता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अँजिओप्लास्टीच्या वेळी एकूण तीन स्टेन टाकले होते. यातील एक स्टेन खराब झाल्यामुळे आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागल्याचे सांगण्यात आले.