शरद पवारांचा भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा, म्हणाले – ‘हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ठाकरे सरकारने विधान परिषदेतील 12 रिक्त जागांसाठी नावांची शिफारस राज्यपाल यांच्याकडे केली आहे. मात्र, यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्त्यांवरून आघाडी सरकारमधील नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर भाष्य करत नाराजी व्यक्त केली. शरद पवार म्हणाले, राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही व घटेनेनं दिलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने यापूर्वी कधी पाहिला नाही, हा चमत्कार सध्या राज्यपालांनी केला आहे, हे दुर्दैवी गोष्ट असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

ज्यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी हे मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशा प्रकारची अडवणूक झाली होती. त्यावेळी मोदींनी राज्यपालांविरोधात तक्रार केली होती. तसे त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले होते. हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावे लागलं. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल तसे करत आहेत आणि केंद्रीतील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, ही चिंतेची बाब असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.