एल्गार परिषद : शर्जिल उस्मानीची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव

पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता तो गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शर्जिलने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत आपल्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यापासून पोलिसांना मज्जाव करावा, अशी मागणीही त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

पुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद झाली होती. यावेळी भाषण करताना शर्जिलने हिंदू धर्म, न्यायव्यवस्था आणि संसदेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी प्रदीप गावडे यांनी तक्रार केल्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी स्वारगेट पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शर्जिलने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आपल्या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नाही किंवा सामाजिक सलोखा बिघडला नाही. त्यामुळे आपल्याविरोधात गुन्हा हा आधारहीन आहे, असा दावा त्याने याचिकेत केला आहे. आपण भाषणात कोणताही धर्म, जात किंवा समुदायाबाबत द्वेषभावना न ठेवता प्रत्येकाने समाजात निर्माण झालेल्या वाईट इच्छाशक्तीविरोधात लढण्याचे आवाहन केले होते, असेही शर्जिलने याचिकेत म्हटले आहे.