साईभक्तांसाठी मुंबई-शिर्डी स्वतंत्र पालखीमार्ग 

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – मुंबईहून शिर्डीला दिंडी घेऊन येणाऱ्या लाखो साईभक्तांच्या सोयीकरीता स्वतंत्र पालखी मार्ग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सदर मार्गाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्तावित पालखी मार्गावर उन्हापासून संरक्षणासाठी वृक्षारोपण, मार्गालगत प्रत्येक १५ किलोमीटर अंतरावर एक निवारा शेड अशा विविध सोयी-सुविधा राहतील. संस्थानच्यावतीने त्यासाठी सहकार्य करण्यात येईल. २५० किलोमीटर लांबीचा हा पालखीमार्ग मुंबईहून शिर्डीला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला राहणार आहे. हा मार्ग १५ फूट रुंदीचा व रस्त्यापेक्षा १ फूट उंचीवर असेल. जेणेकरुन त्यावर वाहने चढू शकणार नाहीत. या पालखीमार्गामुळे मुंबईहून येणाऱ्या साईभक्तांची पदयात्रा सुलभ व आनंददायी होईल, असा विश्वास डॉ. हावरे यांनी व्यक्त केला.

संतापजनक ! अल्पवयीन विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार 

मुंबई येथून दरवर्षी शिर्डीला साडेचार ते पाच लाख भाविक पदयात्रेने येतात. यात तरुणांची व महिलांची संख्याही मोठी असते. बहुतेक पदयात्री मुंबई-आग्रा मार्गे आणि घोटी-शिर्डी मार्गे पालखी घेऊन येतात. त्यामुळे या मार्गावरुन चालणे जिकिरीचे व धोकादायक होते. महामार्गावरील भरधाव वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक साईभक्तांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे साईभक्तांकडून स्वतंत्र पालखी मार्गाची मागणी होत होती.