शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन खात्यातून परस्पर रक्कम काढून कर्जदाराची फसवणूक केल्याचा प्रकार पारनेर येथील श्री साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह अ‍ॅग्रीक्लचर सोसायटीमध्ये घडला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये फसवणूक झालेल्या शहाजी चंदर दौंडकर यांनी संबंधितांवर कारवाई करुन न्याय द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. दौंडकर यांनी 20 लाखाची फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे.

या प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत साबळे यांनी सांगितले की, लॉकडाऊनपूर्वी शहाजी दौंडकर यांच्याकडे पतसंस्थेचे कर्ज होते. दौंडकर यांना आणखी कर्जाची अवश्यकता असल्याने त्यांनी पतसंस्थेकडे मागणी केली. त्यानुसार पतसंस्थेने शिरुर शाखेतून दौडकर यांना 20 लाख रुपयांचे कर्ज मंजुर केले. दरम्यान, पतसंस्थेने दौंडकर यांचे कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन जमा झालेले पैसे परस्पर काढून घेतले. यासंबंधी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केला. त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे अर्ज करण्यास सांगितला.

आर्थिक गुन्हे शाखेने शहाजी दौंडकर यांचा जबाब नोंदवून घेऊन संबंधित पतसंस्थेवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने पतसंस्थेचे शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन चौकशी केली. शाखाधिकारी झावरे यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र, संस्थेचे अध्यक्ष वसंत चेडे आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बडे, पोलीस अधीक्षक यांचा संदर्भ आल्यानंतर झावरे आणि दौंडकर यांचे जबाब फाडण्यात आले. त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने दौंडकर यांना उपोषणास बसावे लागत असल्याचे साबळे यांनी सांगितले.

शहाजी दौडकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांनी आमचे निवेदन घेतले आहे. त्यांनी पोलीस अधीक्षक आणि सहकार खात्याकडून चौकशी करुन न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे. या फसवणुकीमध्ये संस्थेचे अध्यक्ष वसंत चेडे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बडे आणि ब्रँच मॅनेजर श्रीकांत झावरे आदींचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा संशय देखील यावेळी दौंडकर यांनी व्यक्त केला. सदर घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे तसेच कर्ज रक्कम मला माझ्या ताब्यात मिळवून द्यावी अशी मागणी देखील दौंडकर यांनी यावेळी केली आहे.