Shirur Lok Sabha Elections | शिरूर लोकसभा मतदार संघ: राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह?

पुणे – Shirur Lok Sabha Elections | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) सारख्या भ्रष्ट पार्टीसोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आघाडी केल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेत आल्याचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी जाहीर भाषण करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. पाटील यांच्या या विधानामुळे पाटील यांच्यासोबतच शिंदे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?.

लोकसभा निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होत आहे. राज्यात भाजप (BJP), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar NCP) यांची राष्ट्रवादी काँग्रेस युती आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार (Sharad Pawar NCP) यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी सरळसरळ लढत होणार आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत आणि सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच गढूळ झाले आहे. तर राजकीय पुढाऱ्यांचे सत्तापिपासू खरे चेहेरे जनतेसमोर आले आहेत.

पुणे जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास शिरूर लोकसभा मतदार संघात ही परिस्थिती प्रकर्षाने जाणवते. युतीमध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे खरी अडचण झाली आहे ती शिवसेनेकडून तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची. राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या भ्रष्टाचारी पक्षासोबत आघाडी केल्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. परंतु वर्षभरातच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील एक मोठा गट घेऊन भाजप शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. युतीमध्ये ज्या मतदार संघात ज्या पक्षाचा खासदार त्याच पक्षाला ती जागा सोडणार असा निर्णय झाला आणि शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी च्या वाट्याला आला. पण राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) हे शरद पवार यांच्यासोबत राहिल्याने अजित पवार यांच्यापुढे उमेदवारी कोणाला द्यायची हे धर्मसंकट उभे राहिले.

दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), विलास लांडे (Vilas Lande), प्रदीप कंद (Pradeep Kand) अशी नावे पुढे आली पण यापैकी वळसे पाटील आणि कंद यांनी लोकसभेला नकार दिला आहे. तर विलास लांडे यांचा प्रभाव हा भोसरी (Bhosari Vidhan Sabha) पुरता असल्याने त्यांचे नाव पुढे सरकू शकले नाही. अशातच आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवेन अशी जाहीर इच्छा प्रकट केली. यानंतर मात्र आढळराव पाटील यांची चांगलीच संभावना होऊ लागली आहे.

राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवून आम्हाला कायम सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या आढळराव पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास वेगळा विचार करावा लागेल असा थेट इशारा खेड चे अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite Patil ) आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे. तर आढळराव यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या भरवशावर शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांमध्येही चुळबुळ सुरू झाली आहे. राष्ट्रवादीला विरोध म्हणून ठाकरे कुटुंब (Thackeray Family) सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. आता त्याच राष्ट्रवादी मध्ये जाऊन प्रचार करायचा. अशाने लोक तोंडात शेण घालतील, अशी भीती शिवसैनिक व्यक्त करू लागले आहेत. ठाकरे कुटुंबासोबत असलेल्या शिवसैनिकांमध्ये मात्र आढळराव पाटील यांच्या निर्णयामुळे अधिक उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने आढळराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनाचा खरा सत्तापीपासू चेहरा समोर आल्याचा ‘गद्दारी’ वर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येऊ लागला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे: कल्याणीनगरमध्ये पहाटेपर्यंत ‘पब’च्या जवळ युवक-युवतींचा ‘राबता’; व्हायरल व्हिडीओमध्ये तरूण-तरूणींसह अनेक दुचाकी-चारचाकी अन् पोलिस व्हॅन देखील स्पॉट, पोलिस आयुक्तांचे चौकशीचे आदेश (Video)