अमित शहा काश्मीरमध्ये मोठं ‘ऑपरेशन’ करणार ; पुढचा मुख्यमंत्री ‘हिंदू’च असेल : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेत भाजपची सत्ता आली. त्यानंतर गृहमंत्रीपदी अमित शहा विराजमान झाले आहे. अमित शहा यांच्या हातात गृहमंत्रीपद असल्याने देशातीलच नव्हे तर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांमध्ये भितीचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आता भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेनंही यावर शिक्का मोर्तब केला आहे. अमित शहांमुळे काश्मिरमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता शिवसेनेनं वर्तवली आहे. यावर शिवसेनेने आपले मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून मत मांडले आहे. अमित शहा काश्मीरमध्ये मोठी शस्त्रक्रिया करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे काश्मीरचा ‘भूगोल’ बदलला जाईल. परिणामी काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हा हिंदूच असेल, असे मुद्दे अग्रलेखात मांडले आहेत.

अमित शहा यांनी गृहमंत्री झाल्यानंतर काश्मीरमध्ये काय करायचे आहे, हे ठरवले आहे. त्यासाठी अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांची पुनर्रचना केली जाईल. अमित शहांच्या या शस्त्रक्रियेमुळे संपूर्ण काश्मीरचा भूगोलच बदलून जाईल. त्यामुळे काश्मीरचा पुढचा मुख्यमंत्री हिंदू असेल, असा ठाम विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

राजकिय जाणकारांनुसार जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे डिलिमिटेशनवर सध्या बंदी आहे. मात्र, ही बंदी शहा यांच्याकडून उठवली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमध्ये सर्वच मतदारसंघांची नव्याने पुनर्रचना झाल्यास जम्मू भागाला विधानसभेत जास्त प्रतिनिधीत्व मिळू शकते. खोऱ्याच्या तुलनेत जम्मूमध्ये हिंदुंची संख्या जास्त असल्याने काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री सुद्धा बनू शकतो. त्यामुळे अमित शहा हा बदल घडवून आणू शकतो, अस शिवसेनेनं म्हटलं आहे.

दरम्यान, अमित शहांकडून असं झालं तर निर्णयाचे शिवसेना स्वागत करण्यास तयार आहे. जम्मू–कश्मिर विधानसभेचे परिसीमन केले तर स्थानिक लोकांत असंतोष पसरून भडका उडेल अशी भीती सातत्याने दाखवली गेली. पूर्वीच्या काँग्रेस सरकारातील केंद्रीय गृहमंत्र्यांनी नांगी टाकली. आता देशाचेच चित्र बदलले आहे व अमित शहा यांनी कश्मीर प्रश्नाला प्राधान्य दिले आहे. सरकार फालतू आणि वायफळ चर्चांत वेळ दवडणार नाही. सरकार निर्णय घेईल व त्याची कठोरपणे अंमलबजावणी करेल, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.