राज्यात 7 जिल्ह्यातील ‘या’ 15 मतदार संघात शिवसेना – भाजपमध्ये होऊ शकते ‘बंडखोरी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप शिवसेना- भाजप युतीचं त्रांगड सुटण्याचं नाव घेत नाही. त्यातच भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा 26 सप्टेंबरचा मुंबई दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अमित शहा यांच्या उपस्थितीत युतीची घोषणा होण्याची शक्यता मावळली आहे. तर स्थानिक पातळीवरसुद्धा जागांच्या मागणीवरून दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु आहे. युती झाली तर इच्छूकांना कसं आवरायच हे दोन्ही पक्षापुढे मोठ कोडं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात अनेक मतदारसंघामध्ये बंडखोरी होणार हे अटळ आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीची चिंता लागून राहिली असली तरी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्यांना तरी युतीची चिंता लागून राहीली आहे. मागील निवडणूक शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. त्या निवडणुकीपासून इच्छूकांनी यंदाच्या निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी झाली आहे.

मराठवाड्यातील इच्छूक उमेदवारांना युतीची चिंता लागली आहे. युती झाल्यास इच्छूकांच्या मनसुब्याबर पाणी फिरणार हे स्पष्ट असून इच्छूक उमेदवारांनी युती न होण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत. मराठवाड्यात 46 जागापैकी 22 जागांवर युती झाल्यास बंडखोरी होणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे युती झाल्यास दोन्ही पक्षांना बंडखोरांना कसे थोपवायचे हे मोठं आव्हान असणार आहे.
या जागांवर होऊ शकते ‘बंडखोरी’

१) बीड –
बीड विधानसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. याठिकाणी शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेतले. मात्र, मागील निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढल्याने बीडमधून शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदार संघावर शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपचे इच्छूक उमेदवार बंडखोरी करतील. तर भाजपकडे गेल्यास शिवसेनेचे इच्छूक उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

२) उस्मानाबाद –
उस्मानाबाद मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे या मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. तर विद्यमान खासदार शिवसेनेचे असून या ठिकाणी शिवसेनेच्या इच्छूक उमेदवारांकडून या मतदारसंघात निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना आम्ही या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचं सांगतायेत. त्यांना ओमराजे निंबाळकरांचे बळ आहे.

३) नांदेड –
नांदेड विधानसभा मतदारसंघावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. नांदेड दक्षिण आणि उत्तर नांदेड मतदारसंघावर शिवसेनेचा दावा केला आहे. या दोन्ही जागांपैकी एकतरी जागा भाजपला सोडावी यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही जागांवर शिवसेना ठाम राहिल्यास या दोन्ही जागांवर भाजपच्या इच्छूक उमेदवारांकडून बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

४)औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, औरंगाबाद मध्य, गंगापूर, औरंगाबाद पश्चिम आणि पैठण या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्याता आहे. सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र ही जागा भाजपची आहे. तर औरंगाबाद मध्य मधील शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. युती झाल्यास बंडखोरी निश्चीत होणार असल्याची चर्चा आहे.

गंगापूर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपने ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून आपल्याकडे खेचून आणली होती. त्यामुळे युती झाल्यास भाजपचा उमेदवार याठीणी बंडखोरी करू शकतो. पैठण मतदारसंघाची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. तेथील आमदार सेनेचा आहे, पण येथेही भाजपमधून इच्छुक उमेदवार बंडखोरी करु शकतात.

५) हिंगोली –
वसमत मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला असताना भाजपचे शिवाजी जाधव येथून उमेदवारी मागत आहेत. पक्षश्रेष्ठींनी तसा लोकसभेवेळी त्यांना शब्द दिला होता. हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पण शिवसेनेचे माजी आमदार गजानन घुगे भाजपात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कळमनुरीची जागा त्यांच्यासाठी सोडवून घेऊ असा शब्द दिला होता. त्यामुळे आता या जागेसाठीही रस्सीखेच सुरू आहे.

६) परभणी –
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राहुल पाटील असतांना भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे भाजपकडून उमेदवारी मागत आहेत. आनंद भरोसे आणि राहुल पाटील यांच्यात व्यावसायिक व्यवहारातून वितुष्ट आलेलं आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. युती झाल्यास दोघांपैकी एकाला या जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. गंगाखेड मतदारसंघ रासप कडे आहे. मागच्यावेळी रत्नाकर गुट्टे यांनी येथून रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती, पण गुट्टे शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलल्याप्रकरणी तुरुंगात आहे. त्यामुळे आता या जागेवर भाजप आणि शिवसेना आपला हक्क सांगत आहेत.

७) जालना –
जालन्यातील बदनापूर मतदारसंघ युती असताना शिवसेनेकडे होता. 2014 च्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक झाल्याने भाजपचे नारायन कुचे येथून निवडून आले. आता या मतदार संघावर पुन्हा भाजपने आणि शिवसेनेने दावा ठोकला आहे.

Visit : policenama.com