बाळासाहेबांचे हिंदूंसाठी मोठे योगदान, फक्त नाव घेतल्यानं कोणी हिंदूह्रदयसम्राट नाही होत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवरायांची राजमुद्रा असणाऱ्या नव्या ध्वजाचा अनावरण केलं. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘मराठी बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी न करता ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनों आणि मातांनो’ अश्या शब्दांनी केली. त्यामुळे मनसेने आता हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. पक्षाच्या या नव्या भूमिकेमुळे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील मनसेच्या कार्यालयाबाहेर बॅनरवर तसेच सोशल मीडियावरही अनेक पोस्टमध्ये राज ठाकरेंचा उल्लेख हिंदूह्रदयसम्राट असा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. त्यावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंसाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे, त्यामुळे नाव घेतल्याने कोणी हिंदूह्रदयसम्राट होत नाही आणि हिंदुंची मत देखील मिळत नाही असा टोला परब यांनी राज ठाकरेंना लगावला. त्याचप्रमाणे मनसेने याआधीचा झेंडा विविध धर्मियांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचं काय झालं असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे.

मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी अधिवेशनातील भाषणात मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले. तसेच, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर, मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर, हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन” असं राज यांनी ठणकावून सांगितले. तसेच मराठीवेळी मराठी अन् हिंदूवेळी मी हिंदू असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर साहेबांचे खरे वारसदार हिंदूहृदयसम्राट राज ठाकरे या प्रकारचे बॅनर लावल्याने शिवसेना विरुद्ध मनसे असा थेट सामना रंगणार असल्याचे म्हंटले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like