मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसमोरच आमदारांचं नाराजीनाट्य ? ‘खासदार’ राऊतांचा हात ‘आमदार’ भास्कर जाधवांनी झटकला

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर होते. दरम्यान गणपतीपुळे येथील विकास आराखड्याच्या भूमिपूजनासाठी ठाकरे गेले होते. मात्र या कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी चक्क व्यासपीठावरून आपल्याला मंत्रिपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

व्यासपीठावर जेव्हा मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येत होता त्यावेळी त्यांनी उपस्थित शिवसेना नेत्यांना एका फोटोत येण्याची विनंती केली. या दरम्यान खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना आवाज दिला, तसेच त्यांचा हात धरून फोटोत येण्याची विनंती देखील केली. मात्र जाधवांनी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांचा हात देखील झटकला. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समोरच घडला आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कॅमेरातही हा प्रकार कैद झाला. व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर असे काही नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना या दौऱ्यात महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित असतील असा अंदाज लावण्यात येत होता. मात्र रत्नागिरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहिले नाही. यामागील कारण म्हणजे महाविकास आघाडी राज्यात झाली तशी रत्नागिरीत झालेली नाही. रत्नागिरीत शिवसेनाकडून फक्त आघाडीचा दिखावा केला जात असतो. त्यामुळे महाविकास आघाडी ही काय कामाची? त्यामुळे या दौऱ्यादरम्यान अनुपस्थिती दर्शविली असे राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

तसेच सुदेश मयेकर पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. मात्र केवळ दिखावा करण्यासाठी आम्ही गणपतीपुळे येथे अनुपस्थिती दर्शविली नाही. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी काहीच विकासकामे केली नाहीत. शहरातील सर्व कामे ही शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातच होत आहेत. त्यामुळेच आम्हाला ही खोटी आघाडी अजिबात मान्य नाही असा टोला राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.