शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल, म्हणाले – ‘…तर गावागावात दुर्बीण घेऊन भाजपाला शोधावं लागलं असतं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अनेक मुद्यावरून भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष वारंवार परस्पर आक्रमक होताना दिसतात. अशातच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर निशाणा साधत म्हटले की, भाजप हा शिवसेनेच्या कुबडी आणि आमची शिडी घेऊन भाजपा महाराष्ट्र राज्यात वाढली. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद नसते तर गावागावात दुर्बिणीनं भाजपाला शोधावं लागलं असतं. अशी घणाघाती टीका खा. सावंत यांनी केलीय.

अरविंद सावंत म्हणाले, संघाच्या शाखेवर दोन माणसं उभी असायची. महाराष्ट्रात भाजपाचा विस्तार शिवसेनेमुळे झाला आहे. ही शिडी भाजपानं विसरणं म्हणजेच कृतघ्नपणा आहे. तर कोरोनाबाबत केंद्र सरकारचे वाभाडे जगभरात निघत आहेत. उरलेसुरले कालच्या निवडणूक निकालात गेले आहेत. देशात क्रांती घडत आहे. महाराष्ट्राने क्रांती घडवण्याला सुरुवात केलीय. गुडघ्याला बाशिंग बांधू नये. पंढरपूरचा निकालानंतर राज्य सरकारवर संक्रमण येणार असेल तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही मोठ्या राज्यात तुमचा पराभव झाला आहे. त्यामुळे केंद्रातील सरकारने प्रथम राजीनामा द्यायला हवा. त्यानंतर आमच्या सरकारवर बोला अशा शब्दात खा. अरविंद सावंत यांनी भाजपाला ठणकावलं आहे.

सिरमचे सीईओ पुनावाला यांना दिलेल्या धमकीवरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर खा. सावंत म्हणतात, भाजपाची अवस्था म्हणजे उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे. सत्तेत येण्यासाठी शिवसेनेची बदनामी केली जात आहेस. असे ते म्हणाले, पुढे भाजपचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत सावंत म्हणाले की, बेळगावचा प्रश्न जिवंत राहिला तो शिवसेनेमुळेच. १०६ हुतात्मे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी दिले. बेळगावसह महाराष्ट्रासाठी शिवसेनेने ६९ हुतात्मे दिले. त्यामुळे बेळगाव प्रश्नावर पोरकटपणे बोलू नये. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराविरोधात माजी मुख्यमंत्री प्रचाराला बेळगावात गेले होते. त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. आशिष शेलार यांना विकृती नव्हे तर विकार झाला आहे. अशी गंभीर टीका खा. सावंत यांनी केली आहे.