शिवसेनेचा सामनातून भाजपवर टीकेचा बाण, म्हणाले – ‘…अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात 5 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या असल्या तरी अवघ्या देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालकडे लागले होते. या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा अधिक जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या जागा वाढल्या असल्यातरी त्यांना विजय मिळवता आला नाही. यावरून आता शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीकेचा बाण सोडला आहे. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे झाले तर भाजप हरला अन् कोरोना जिंकला असे म्हणत शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. केवळ बंगाल काबीज करायचा या एका ईर्षेने मोदी, शहांचा भाजप मैदानात उतरला होता. त्यांनी लाखोंच्या सभा, रोड शो करून कोरोनाचे नियम पायदळी तुडवले अन् आता निवडणुका संपल्यावर दिल्लीत येऊन कोरोना निवारणाच्या देवपूजेला लागले, पण वेळ हातची गेली आहे. इतके करूनही बंगाली जनतेने भाजपला साफ नाकाल्याचे म्हणत शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

Advt.

ममता बॅनर्जी यांचा गड काबीज करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपने काय करायचे बाकी ठेवले? जय श्रीरामचे नारे देण्यापासून ते ममतांना बेगम ममता असे डिवचण्यापर्यंत हिंदू- मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. ज्या ठिकाणी हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जीनी विजय मिळविला.ममतांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूलने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळय़ांसाठी प्रेरणादायी आहे. बंगालातील लढाईत डावे व काँग्रेस कुठे औषधालाही उरले नाहीत. डाव्यांची जागा भाजपने घेतली. भाजपने अनेक मोहरे उभे केले. केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियोपासून पत्रकार स्वपन दासगुप्तांपर्यंत. ते सगळे आडवे झाले. ममतांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममतांचीच होती, हे त्यांनी दोनशेवर जागा जिंकून ममतांनी ते सिध्द केले आहे.

पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भाजपने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. त्या ठिकाणी सामना काँग्रेसशी झाला. तामिळनाडूत द्रमुकने सत्ता मिळवली. पुद्दूचेरीत भाजपने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपच्या हाती नव्याने काय लागले? मोदी-शहांचा करिश्मा की काय, तो दक्षिणेत म्हणजे केरळ-तामीळनाडूत चाललाच नाही व प. बंगालात धाप लागेपर्यंत प्रचार करूनही यश मिळाले नाही. ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव असून या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवावे. पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेंव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.