नामांतरावरून वाद : ‘चर्चा होईल, पण CM ठाकरेंचा निर्णय स्पष्ट झालाय’, शिवसेनेचा काँग्रेसला सज्जड दम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा निर्णय स्पष्ट केला आहे. हा लोकांच्या भावनेचा विषय आहे, यावर चर्चा होईल,परंतु निर्णय झालेला आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे दम दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे अशी चर्चा सुरु आहे. यावरून महाविकास आघाडी सरकारमधील सेना आणि कॉंग्रेसमध्ये वाद पेटला आहे. यातच नुकतेच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारत भाजपा आणि शिवसेनेवरही निशाणा साधला आहे. नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? अशा शब्दात काँग्रेसने शिवसेनेला सुनावले होते. तर दुसरीकडे शिवसेनेने काँग्रेसच्या आक्षेपाला दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत खासदार राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या प्रेमात कोणीही पडू नये, राज्यातील राजकारण्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरच प्रेम कराव असे मला वाटते. औरंगजेब हा क्रूर शासक होता, तो धर्मांध होता, त्याला परधर्माबद्दल अजिबात प्रेम नव्हते, अशा राजाच्या नावासाठी राज्यात आणि देशात कोणीही आग्रही असू नये, संभाजीनगर हे नाव शिवसेनेने दिलेले आहे. त्यावर कोणी आक्षेप घेऊ नये, औरंगजेबाने हिंदूंची धर्मांतर, छळ केला ही माहिती औरंगजेबावर प्रेम करणाऱ्यांनी मिळावी यासाठी लेख लिहिला होता अस त्यांनी सांगितले.

तर मतांचे राजकारण नाही, हा चांगला आणि वाईट असा विषय आहे, मतांचा नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक असले तरी त्यांच्या इतका सेक्युलर राजा दुसरा कोणीही झाला नाही. औरंगजेब, बाबर ही आमची प्रतिक होऊ शकत नाही. विरोध करणाऱ्यांनी आधी औरंगजेब समजून घेतला पाहिजे, असे खा. राऊत म्हणाले.