Video : छ. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी, निलंगेकरांकडून ठाकरे सरकारवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने हटवल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. हा मुद्दा भाजप नेते आणि माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत मांडत महाराष्ट्र सरकार निजामी सरकार असल्याचे घणाघात केला. तसेच येत्या 15 दिवसांत जर सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही तर लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा पाटील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

याबाबत विधानसभेच्या सभागृहात संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र घडला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय विधानसभेत मांडू न देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. लातूर जिल्ह्यातील रायवाडी येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा गावकऱ्यांनी वर्गणी काढून उभारला होता, परंतु प्रशासनाने कोणाचीही याबाबतीत एकही तक्रार नसताना हा पुतळा काढून टाकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्यावेळी कर्नाटकात अशाप्रकारे महाराजांचा पुतळा हटवला होता त्यावेळी सरकारसोबत आम्हीसुद्धा त्याठिकाणी जाऊन छत्रपतींचा पुतळा पुन्हा बसवला, मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा हटवण्याचे काम ठाकरे सरकारने केल्याची टीका पाटील यांनी केली आहे.