शिवाजी पार्कचे नवे ‘बाळासाहेब’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी पार्कवर सभा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवसैनिकांची अलोट गर्दी हे समीकरण बनले होते. या समिकरणाला शनिवारच्या गर्दीने छेद दिला असून शिवाजी पार्कने नवे बाळासाहेब पाहिले.

भारिप व एमआयएम यांच्या वंचित बहुजन आघाडीची शनिवारी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेला दलित, मुस्लिम बांधवांसह कोळी बांधवाची मोठी गर्दी झाली होती. या जाहीर सभेत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मार्गदर्शन करुन संविधान बचाव चा नारा दिला. शिवाजी पार्कचा कानाकोपरा भरलेला होता. हिरवा, भगवा, निळा, पिवळा, लाल अशा सर्व रंगी झेंडे मैदानात सर्वत्र फडकत होते.

शिवाजी पार्कने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट जाहीर सभा वर्षानुवर्षे पाहिल्या आहेत. दसऱ्याला शिवसेनेचा होणारा मेळावा हा सर्वाधिक गर्दीचा मेळावा म्हणून गणला जात होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांना सभेसाठी बंदी करण्याचा विषय आला. तेव्हा न्यायालयानेही शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला परवागनी दिली. या मेळाव्याइतकी गर्दी अन्य कोणत्याही जाहीर सभेला शिवाजी पार्कला मिळाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना १९९९ साली झाली. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलोट गर्दी झाली होती. भारिप आणि एमआयएम यांच्या आघाडीच्या जाहीर सभांना राज्यभरात सर्वत्र मोठी गर्दी होताना दिसून येते.

शिवाजी पार्कवर शनिवारी झालेली गर्दी ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षा अधिक गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार या मेळाव्याला १० लाख लोकांनी गर्दी केली होती. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कने बाळासाहेब आंबेडकर यांच्या रुपाने नवे बाळासाहेब पाहिले.

या सभेत ओवेसी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ला हा मोदी सरकारचा पराभव असल्याची टिका केली. ते म्हणाले, पुलवामामध्ये झालेला भ्याड हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. हल्ला झाला तेव्हा देशातील सुरक्षा यंत्रणा काय करीत होत्या. याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. पाकिस्तानी मंत्री म्हणतो युद्ध झाले तर मंदिरातील घंटा वाजणार नाही. तुम्ही देशाला ओळखले नाही. येथे जोवर मुस्लिम आहे. तोवर मशिदीतून अजान, मंदिरांतून घंटानाद, चर्च, गुरुद्वारांमधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. जेव्हा देशाचा प्रश्न येतो, तेव्हा आम्ही सर्व एक असतो.

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, आरएसएसच्या धर्माची सत्ता आली. मात्र, भटक्या विमुक्तांकडे भिक्षेशिवाय जगण्याचे साधन नाही. हा हिंदू नाही का?. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा जनतेचे ऐकण्यास तयार नाही. हे सर्व पक्ष एकाच नाण्याच्या बाजू आहेत.