Nitesh Rane News : ‘… घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा !’, भाजपाच्या आमदाराचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊत यांच्यासह शिवसेना आक्रमक झाली आहे. येत्या 5 जानेवारी रोजी ईडीकडून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेच्या याच कृतीवर आमदार नितेश राणे यांनी बोट ठेवले आहे. ट्विटरद्वारे आमदार राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे… हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही… हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही… हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही… पण वैयक्तिक घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?,” असे ट्विट करत नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, येत्या 5 जानेवारी रोजी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार असल्याने सेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 5 जानेवारीला मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर परिसरातून बसेस आणि खासगी गाड्यांनी शिवसैनिक मुंबईत येणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांत शिवसेना नेत्यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आल्यामुळे शिवसेनेने आता ईडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना एका पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बॅंकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रे घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होते. मात्र, पुढे या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचे काम HDIL कडून करण्यात येत होते.