महाराष्ट्रातील ‘या’ पक्षाचे खासदार मराठीतच घेणार शपथ

कल्याण: पोलिसनामा ऑनलाईन- महाराष्ट्रातील शिवसेनेचे सर्व खासदार मराठीत शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना ही मराठी अस्मितेवर चालणारी संघटना असून शिवसेनेने नेहमीच मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी लढा दिला आहे, असे शिंदे यांनी म्हटले. खासदार झाल्यानंतर ते शिंदे हे प्रथमच डोंबिवलीत मतदारांना भेटण्यासाठी आले असताना बोलत होते.
शिंदे म्हणाले, मागील दहा वर्षांपासून शिवसेनेच्या सर्व खासदारांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अशा अभिमानास्पद भाषेतूनच आम्ही खासदारकीची शपथ घेणार आहोत. दरम्यान, महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. मराठीत ‘शपथ’ हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर ही मागणी जोर धरू लागली आहे. आपल्या मातृभाषेत शपथ घेण्याची तरतूद असूनही अनेक खासदार हे इंग्रजीतून शपथ घेत असतात. यामुळेच राज्यातील नेटीझन्सने खासदारांनी मराठीतून शपथ घेण्याची मागणी लावून धरली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सने मोठ्याप्रमाणात केलेल्या या मागणीचा विचार करून राज्यातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचे मान्य केले आहे.
मातृभाषेचा पर्याय असून महाराष्ट्रातील खासदार हिंदी अथवा इंग्रजीतून शपथ घेतात. केवळ शिवसेनेचे खासदार नेहमीच मराठीतून शपथ घेत आले आहेत. राज्यातील खासदारांनी हिंदी अथवा इंग्रजीतून शपथ घेण्याची ही प्रथा बंद करण्यासाठी आणि मराठीच्या अस्मितेसह अभिजात दर्जाच्या आग्रहासाठी ही मोहीम नेटीझन्सकडून राबविली जात आहे.