शिवसेनेनं केला सवाल – ‘अण्णा नक्की कोणाच्या बाजूने ?’, राज्यातील जनतेला कळू द्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेती संदर्भातील काही मागण्या घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यानच्या काळात त्यांनी केंद्र सरकाच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त करत टीकेची झोड उठवली होती. मात्र, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल शुक्रवारी अण्णांनी आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली. या सर्व घडामोडीवर शिवसेनेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या! असा सवाल शिवसेनेने केला आहे.

काय म्हंटल आहे सामनाच्या अग्रलेखात…
लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांचा स्वाभिमान याबाबत अण्णांना भूमिका घ्यावीच लागेल. राळेगणात बसून भाजपच्या नेत्यांसोबत प्रस्ताव आणि चर्चेच्या फेऱ्या करुन काय उपयोग? अण्णांनी आधी उपोषण जाहीर केले आणि आता केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर विश्वास ठेवून ते स्थगित केले. हे सगळे ठीक आहे, पण शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करणाऱ्या कृषी कायद्यांबाबत त्यांची भूमिका काय आहे? या कायद्यांविरोधात सिंघू बॉर्डरवर मरमिटण्यास तयार असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अण्णांचा पाठिंबा आहे का? अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या!

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी निर्णायक उपोषणाची घोषणा केली होती व अण्णांनी उपोषण करु नये म्हणून महाराष्ट्रातील भाजप पुढारी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांशी चर्चा करीत होते. हे चित्र तसे गमतीचे होते आणि घडलेही अपेक्षेप्रमाणेच. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले. केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील असा आपल्याला विश्वास वाटतो, म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत, असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे. त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

भाजप नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे अण्णांचे समाधान झाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मूळ प्रश्न आहे तो सध्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जे दमनचक्र सुरु आहे, कृषी कायद्याची जी दहशत निर्माण झाली आहे त्याचा. यासंदर्भात एक निर्णायक भूमिका अण्णा घेत आहेत आणि त्यादृष्टीने उपोषण करीत आहेत असे एक चित्र निर्माण झाले होते. मात्र अण्णांनी उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे कृषी कायद्यांबाबत त्यांची नेमकी भूमिका काय हे तूर्त तरी अस्पष्टच आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.