कोल्हापुरात ‘आपलं ठरलंय’चीच चलती ; शिवसेनेचे संजय मंडलिक ‘एवढ्या’ मतांनी विजयी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होती. राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक तर भाजप -शिवसेना महायुतीकडून प्रा. संजय मंडलिक निवडणुकीच्या रिंगणात होते. चुरशीच्या लढतीत या निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक हे २ लाख ६५ हजार ३९ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांना ४,६७,०८६ एवढी मते मिळाली. तर मंडलिक यांना ७,३२,१२५ मते मिळाली. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ७४ हजार ३४५ हजार मतदार आहेत. त्यापैकी १३,२५,२३१ मतदारांनी मतदान केले होते.

कोल्हापुरातून १३ जण रिंगणात होते. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. कोल्हापूर मतदारसंघाची मतमोजणी रमणमळा परिसरातील शासकीय धान्य गोदाम येथे सुरु होती. पाचव्या फेरिअखेर मंडलिक ६०३९९ आघाडीवर होते. तर ८ व्या फेरीत ७६ हजार मतांनी मंडलिक आघाडीवर होते. त्यानंतर त्यांचीच आघाडी कायम राहिली आणि त्यांना तब्बल २,६५,०३९ मतांची आघाडी मिळली. त्यामुळे कोल्हापुरात दुपारच्या मतमोजनीपर्यंतच विजयोत्सवाला सुरुवात झाली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चांगलीच राजकीय खडाजंगी रंगली. जनतेचा कौल शिवसेनेचे मंडलिक यांनाच मिळाला. मतमोजणीच्या दरम्यान दोन्ही गटांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते.

खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील हे वैर डोके वर काढत असल्याचे बोलले जात होते. सतेज पाटील यांचा कोल्हापुरात चांगलाच दबदबा आहे. सतेज पाटील स्वतः जरी लोकसभेच्या रिंगणात नसले तरी मात्र आघाडीत असून देखील शिवसेनेला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका महाडिकांना आणि राष्ट्रवादीला बसणार असल्याची जोरदार चर्चा कोल्हापुरात होती.

‘आपलं ठरलंय’ चीच सरशी

‘आमचं ठरलंय’ म्हणत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सगळी रसद शिवसेनेच्या प्रा. मंडलिक यांना पुरवली होती. तर खा. शरद पवार यांनी ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ असे प्रत्युत्तर ‘आपलं ठरलंय’ या सोशल मीडियावरील प्रचारतंत्राला दिले होते. त्यामुळे निकालानंतर ‘आपलं ठरलंय’ लाच यंदाच्या निवडणुकीत सरशी मिळल्याचे पाहायला मिळाले. जरी लोकसभेचा निकाल लागला तरी ‘आपलं ठरलंय’ आणि ‘मीबी ध्यानात ठेवलंय’ चा संघर्ष लोकसभा निवडणुकांनंतर देखील चालूच राहणार अशी चिन्हे आहेत.