मालेगावमधील ‘उच्चपदस्थ’ अधिकारी ‘कोरोना’बाधित, मंत्री-अधिकारी हादरले

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव शहरातील कोरोना साथीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता बुधवारी (दि.12) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दुसऱ्यांदा मालेगाव दौऱ्यावर आले होते. दुपारी शासकीय विश्रामगृहावर कोरोना परिस्थितीबाबत मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत बैठक सुरु असतानाच मालेगाव महानगरपालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बैठकी सुरु असतानाच या अधिकाऱ्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह मंत्र्यांना देखील हादरा बसला.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरातील पालिका, महसूल, पोलीस यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस लढत असताना त्यांनाच आता कोरोनाने ग्रासायला सुरुवात केल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेतील या उच्चपदस्थ अधिकीऱ्याची नुकतीच मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीला एक महिना देखील पूर्ण होत नाही तोच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे मालेगाव येथे आले होते.

त्यामुळे शासकीय विश्रामगृहावर स्वत: कृषिमंत्री दादा भुसे, माजी आमदार आसिफ शेख, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल या लोकप्रतिनिधींसह सर्वच विभागांचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी उपस्थित होते. टोपे दाखल होताच बैठकिला सुरुवात झाली यावेळी खरे तर कुणालाही कल्पना केली नसेल की आपल्या शेजारी बसलेले उच्चपदस्थ अधिकारी देखील कोरोना पॉझिटिव्ह येऊ शकतात. खुल्या मैदानात शारीरिक अंतर ठेऊन बैठकिचा पहिला टप्पा पार पडला. इतक्यात या अधिकाऱ्याला निरोप दिला आणि ते बैठकीतून निघून गेले.

दुसऱ्या टप्प्यातील बैठक सुरु झाली. मात्र, हे उच्चपदस्थ अधिकारी बैठकीला उपस्थित नसल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले. अखेर स्वत: मंत्री महोदयांनीच अधिकाऱ्यंबाबत चौकशी करून ते कोठे आहेत अशी विचारणा केली. त्यावेळी या अधिकाऱ्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जावे लागल्याचे सांगण्यात आले. यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला. सगळ्यांचे चेहरे चिंताग्रस्त झाले. अखेर मंत्र्यांनी त्यांना काळजी घ्यायला सांगा असा उपस्थित अधिकाऱ्यांमार्फत निरोप देत उर्वरीत कामकाज संपवले.