‘टिक-टॉक’ कलाकार निघाला सराईत चोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाईला वेड लावणाऱ्या ‘टिक-टॉक’चे वेड चोरट्यांना देखील आहे. अशाच एका ‘टिक-टॉक’ कलाकाराला घरफोडी प्रकरणात जुहू पोलिसांनी अटक केली आहे. जुहू परिसरातील घरफोडीचा तपास करत असाताना पोलिसांना या चोराचा ‘टिक-टॉक’ व्हिडीओ दिसला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली.

अभिमन्यू गुप्ता (वय-२६) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुप्ता नेहमी ‘टिक-टॉक’ वर अ‍ॅक्टीव्ह राहतो. त्याच्या या अ‍ॅक्टीव्ह राहण्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. गुप्ता हा कुर्ल्यातील बैलबाजार परिसरात राहतो. त्याने जुहू तारा रोड परिसरात घरफोडी केली होती. या गुन्ह्यात पोलीस गुप्ताचा शोध घेत होते. मात्र, तो सापडत नव्हता.

गुप्ताने जुहू तारा रोड परिसरात राहणाऱ्या एक वृद्ध जोडप्याच्या घरात चोरी करून लाखोंचे दागिने चोरून नेले होते. ही चोरी अभिमन्यू गुप्ता याने केल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. तसेच तो नेहमी ‘टिक-टॉक’वर अ‍ॅक्टीव्ह राहत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी या माहितीच्या आधारेच गुप्ताला अटक केली.