पुण्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असताना पठ्ठयानं उघडयावरील नाल्यात धुतली रूग्णवाहिका

पुणे, ता. ७ : पोलीसनामा ऑनलाइन : रेसकोर्स मैदानाच्या खालून भूमिगत कालवा आहे. जो खडकवासला येथून सुरू होत पुढे बारामती, इंदापूर येथे जातो. त्याचे पाणी एम्प्रेस गार्डन मधील झाडांसाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी वापरले जाते. याच पाण्याच्या उघड्या भागावर वाहने धुतली जातात. परंतु याच पाण्यात उघड्यावर अनेक दिवसांपासून रुग्णवाहिका उघड्यावर धुण्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे. पुण्यातील रेसकोर्स व एम्प्रेस गार्डन दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या लहान डोहात चक्क उघड्यावरच रुग्णवाहिका धुवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथून नेहमी जाणारे नागरिक राहुल कांबळे यांनी या घटनेची माहिती दिली.

याबाबत वाहन धुणाऱ्या चालक अक्षय गवळी यांना विचारले असता तो म्हणाला, “आमची गाडी ससून रुग्णालयाच्या मुख प्रवेशद्वारावर असते. रणजित जानकर यांच्या मालकीची ही रुग्णवाहिका आहे. येथेच आम्ही गाडी धुण्याचे काम करत असतो. आज एका रुग्णाला सोलापूरला सोडून आलोय. त्यामुळे रस्त्यात थांबून आता स्वछता करतोय. तुम्ही आमचे मालक जानकार किंवा रुग्णवाहिका संघटनेचे बाळासाहेब हिंगणे यांना विचारू शकता.

जानकर यांच्याशी संपर्क साधल्यावर ते म्हणाले, “आजच तो एका रुग्णाला सोलापूरला सोडून आला आहे. तो रुग्ण कोरोनाबाधित नव्हता, त्यामुळे तुम्ही समजून घ्या साहेब!” असे उत्तर देऊन त्यानी टाळाटाळ केली. परंतु, कोरोनाच्या या भयंकर परिस्थितीत जर रुग्णवाहिका अशा प्रकारे बेजबाबदारपणे वागत असतील तर सामान्य माणसाच्या आरोग्याचा मोठा प्रश्न समोर येतो. यावर आळा कोण घालणार हा मोठा प्रश्न आहे.