सिध्दार्थने केली बीडच्या अनाथ मुलांना आर्थिक मदत. 

मुंबई  : वृत्तसंस्था – मराठी सिनेमातील  सगळ्यांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सामाजिक भान ठेवत नुकत्याच एका कार्यक्रमात बीडच्या सहारा अनाथालयाच्या निराधार मुलांच्या चेह-यावर आनंद फुलवण्याचे कार्य केले आहे .८५ मुले राहत असलेल्या या अनाथालयाला सिद्धार्थने धनराशी भेट दिली आहे.

गेल्या १४ वर्षापासून सहारा अनाथालयाची स्थापना करून अनेक उपेक्षित, आणि वंचित मुलांना घर मिळवून देणा-या संतोष गर्जेचा त्याच्या सामाजिक कामासाठी अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सत्कार करण्यात आला. तेव्हा संतोषने मनमोकळं करताना आपली आत्मकथा आणि निराश्रीत मुलांची व्यथा सांगताच भावूक होऊन सिध्दार्थने सर्वांसमक्ष धनराशी देण्याचे जाहीर केले.

यावेळी सिद्धार्थ म्हणाला की, ‘बीडच्या पाटसरा ह्या दुर्गम खेड्यातल्या गरीब उसतोडणी कामगाराच्या घरात जन्मलेल्या संतोषचा मला अभिमान आहे. वयाच्या १९ व्या वर्षापासून तो अनाथ आणि उपेक्षित मुलांसाठी काम करतो. त्याच्या सहारा अनाथालयात ८५ निराधार मुलं आहेत. ह्या मुलांसाठी मी खारीचा वाटा उचलला. इतकेच म्हणेन. जी मी धनराशी दिली, ती संतोषच्या कार्यापूढे फार छोटी होती.

’सिद्धार्थ जाधवने मराठी चित्रपटसृष्टीत त्याच्या अभिनयाने एक वेगळी जागा निर्माण केली आहे. याच बरोबर  तो आज बॉलिवूड मधील चित्रपटात  खूपच चांगल्या भूमिका साकारत आहे. लवकरच त्याचा सिम्बा हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अली खान यांच्यासोबतच सिद्धार्थ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.