CoWin ऍपवर नाही तर पोर्टलवर जाऊन करावे लागणार रजिस्ट्रेशन; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वयापेक्षा जास्त व्यक्ती ज्यांना इतर गंभीर आजाराने ग्रासले आहे, अशा लोकांना लस दिली जात आहे. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातही लस देण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

पहिल्या टप्प्यात फक्त सरकारी केंद्रांवर लस दिली जात होती. मात्र, आता खाजगी रुग्णालयातही लस दिली जाणार आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक. 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले पण ज्यांना गंभीर आजाराने ग्रस्त असतील, त्यांनाही लस देण्यात येत आहे. वयाची गणना जानेवारी 2022 नुसारे केली जाणार आहे. गंभीर आजाराची यादीही सरकारकडून जारी केली आहे. या रुग्णांना डॉक्टरांच्या सर्टिफिकेटची गरज आहे.

CoWin पोर्टलवर रजिस्ट्रेशनची सुविधा
लसीकरणासाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी केली आहे. या रजिस्ट्रेशनसाठी कोविन ऍप, आरोग्य सेतूची मदत घेता येऊ शकते. याशिवाय ऑन-साईट रजिस्ट्रेशन म्हणजेच लसीकरण केंद्रावर जाऊन स्वत:चे नाव रजिस्ट्रर करू शकता. ज्यांच्याकडे स्मार्टफोन किंवा इंटरनेट नाही अशा लोकांसाठी ही सुविधा असणार आहे.

CoWin सर्वांसाठी नाही तर…
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की cowin.gov.in या CoWin पोर्टलच्या माध्यमातून कोरोनावरील लसीकरणासाठी अपॉईंटमेंट घेऊ शकता. याशिवाय मंत्रालयाकडून दिलेले माहितीमध्ये म्हटले, की सर्वसामान्यांसाठी CoWin ऍप नाही. तर प्ले स्टोअरवरील सध्याचे ऍप फक्त ऍडमिनिस्ट्रेटर्ससाठी आहे.

खाजगी रुग्णालयातही लस
कोरोनावरील लस देण्याची परवानगी खाजगी रुग्णालयांनाही दिली गेली आहे. त्यासाठी सरकारकडून कडक निर्देश दिले आहेत. त्याचे कठोरपणे पालन करण्याची गरज आहे. राज्यांनाही पूर्ण खबरदारी घेऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे डॉक्युमेंट गरजेचे…
– आधार कार्ड किंवा व्होटर आयडी कार्ड

– ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड किंवा व्होटर कार्ड नसेल तर आयडी कार्ड ज्याच्यावर तुमचा फोटो असेल.

– रजिस्ट्रेशनसाठी लसीकरण केंद्रावरही ऑफिशियल आयडी कार्ड दाखवावे लागेल.